भावनाशून्य
निरागस
एक स्वप्न,
पण
समोरच्या
लख्ख प्रकाशात
अंधार शोधत
स्वप्नांचा
पडावा विसर
कायमचा….
आणि चालताना
अंतराचा,
सोबतीला
वेदना विसरलेले
पाय आणि
पाठीला
चिकटलेले पोट,
अहवेलना
कालच्या
आणि आजच्या
सारख्याच…? ।।
उपेक्षितपणा…
जणू
त्याच्या
पाचवीला पुजलेला,
पोटाची खळगी
रिकामी राहावी
अशीच काहीशी
नियती,
जो भरतो
तो नशीबवान,
पण
तो मात्र…
भरकटलेला…
मैलोनमैल चालणारा
स्वप्नाच्या शोधात,
कधीही न
संपणाऱ्या
प्रवासाला ।।
आशावाद कधीचं
टांगून ठेवला
त्याने खुंटीवर,
पण
एक स्वप्न
साधं….
….खडतर,
सहजच विचारतो…..
पोहचलो का?
उत्तर ठरलेलं
नाही. ।।
अजुन
एक दिवस
फरफट…
वाटत
टेकावी पाठ
एखाद्या
झाडाखाली,
मिळावा…
एक
अन्नाचा दाणा
आणि पाणी,
हेचं झालं
आता
एक स्वप्न
निरागस
भावनाशून्य…..।।
ओमकार
२७ मे २०२०